नवी दिल्ली : एनसीईआरटी म्हणजेच नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने पहिल्यांदाच इयत्ता ९ वीच्या सामाजिक विज्ञान पुस्तकात १९७५-७७ च्या आणीबाणीचा समावेश केला आहे. ‘अंडरस्टँडिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड’ या नवीन पुस्तकात आणीबाणीला भारतीय लोकशाहीसमोर आलेल्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणून वर्णन केले आहे.
एनसीईआरटीच्या एका अधिका-याने पुष्टी केली आहे की, इयत्ता ९ वीच्या पुस्तकात पहिल्यांदाच आणीबाणीवर एक स्वतंत्र विभाग जोडण्यात आला आहे. हा बदल अशा वेळी झाला आहे, जेव्हा देशाने नुकतेच आणीबाणी लागू झाल्याच्या ५० वर्षांची आठवण केली आहे. पुस्तकात लिहिले आहे की, १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात लोकांमध्ये नाराजी वाढत होती. बेरोजगारी, महागाई आणि गैरव्यवस्थापनाच्या आरोपांमुळे अनेक ठिकाणी निदर्शने झाली. त्यानंतर जून १९७५ मध्ये अंतर्गत अशांततेच्या आधारावर राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली.
















