फेरबदलाच्या हालचाली, नव्या चेह-यांना मिळणार संधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू आहे. त्यातच २ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि बी. एल. संतोष यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. ३ तास चाललेल्या या बैठकीत सरकार आणि संघटनेतील नव्या चेह-यांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती समोर ठेवून हा फेरबदल असून, अनेक वरिष्ठ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होऊ शकतो. दरम्यान, अर्थखाते महाराष्ट्राच्या नेत्याच्या हाती येण्याची शक्यता असून, यात पियूष गोयल यांचे नाव आघाडीवर आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार काही केंद्रीय मंत्र्यांना संघटनेत पाठवले जाऊ शकते तर संघटनेतील काही वरिष्ठ नेत्यांना सरकारमध्ये मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. सध्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे नाव अर्थमंत्रीपदासाठी आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या गोयल यांना अर्थव्यवस्थेचे चांगले ज्ञान आहे. गोयल हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
सीतारामन शिक्षणमंत्री?
सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे. त्या धर्मेंद्र प्रधान यांची जागा घेण्याची शक्यता आहे. अनुराग सिंह ठाकूर यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यांना कॅबिनेट खाते मिळू शकते. तसेच आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे नावही मंत्रिपदाच्या चर्चेत असल्याचे समोर आले आहे. पंजाबमधील तरुण चुग यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
मित्रपक्षांनाही लॉटरी?
मोदी मंत्रिमंडळात एनडीएतील मित्रपक्षांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी एखाद्याला मंत्रिपद मिळू शकते. जेडीयूप्रमुख नीतीश कुमार यांनीही केंद्रात आपल्या पक्षाला अधिक प्रतिनिधित्व मिळावे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांनाही संधी मिळू शकते.















