मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री क्रिती सेनॉन हिच्या वैयक्तिक आयुष्याची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. ती लंडनमधील प्रसिद्ध उद्योगपती कबीर बाहियाला डेट करत असल्याचे बोलले जात असून, यापूर्वीही अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोघे एकत्र दिसले आहेत. मात्र, नुकत्याच अॅजबेस्टन येथे पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यादरम्यान या जोडीने स्टेडियममध्ये लावलेल्या हजेरीने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
सामना सुरू असताना जेव्हा कॅमेरा प्रेक्षक गॅलरीतील क्रिती आणि कबीर यांच्याकडे गेला, तेव्हा त्यांच्या अगदी मागे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा देखील सामना पाहताना दिसून आला. कबीरचे धोनी कुटुंबाशी अत्यंत जवळचे नाते असून, तो धोनीची पत्नी साक्षी धोनी हिचा चुलत भाऊ म्हणजेच नात्याने धोनीचा मेहुणा लागतो.
कबीर बाहिया हा लंडनमधील एक नामांकित व्यावसायिक असून तो अत्यंत वैभवशाली जीवनशैली जगतो. धोनी कुटुंबाच्या विविध कौटुंबिक सोहळ्यांमध्ये आणि सुट्यांच्या नियोजनात तो नेहमीच त्यांच्यासोबत सहभागी असतो. कबीरचे वडील कुलजिंदर बाहिया हे युनायटेड किंग्डममधील प्रसिद्ध ट्रॅव्हल एजन्सी ‘साऊथ हॉल ट्रॅव्हल’चे संस्थापक आहेत. या व्यावसायिक पार्श्वभूमीमुळे क्रीडा क्षेत्रातील अनेक नामवंत खेळाडूंशी कबीरचे सलोख्याचे संबंध आहेत. काही दिवसांपूर्वीच क्रिती सेनॉनने तिचा ३४ वा वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला होता, ज्यामध्ये तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसह कबीरनेही हजेरी लावली होती.
क्रिती सनॉन आणि कबीर बाहिया या दोघांनीही अद्याप आपल्या प्रेमसंबंधांची माध्यमांसमोर अधिकृत कबुली दिलेली नाही, मात्र सोशल मीडियावर त्यांच्या एकत्र फिरण्याचे अनेक फोटो सातत्याने समोर येत असतात.
















