मुंबई : लग्नापूर्वी खोटी माहिती देणे, तसेच नपुंसकत्व लपवण्याचा प्रयत्न करणे शिवाय शारीरिक, आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात तीन दिवसांपूर्वीच तक्रार दाखल केली होती. यानंतर आता विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण ठाणे न्यायालयाने विनायक राऊत आणि गितेश राऊत यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
गिरीजा राऊत यांनी आरोप केले की लग्नापूर्वी स्वत:चा बंगला असल्याचे खोटे सांगून फसवणूक करणे, नपुंसकत्व लपवण्यासाठी विवाहितेवर भोंदूबाबांच्या माध्यमातून अघोरी जादूटोणा करणे आणि शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ करून मला त्रास दिला आहे. याप्रकरणी गिरीजा राऊत यांनी माजी खासदार विनायक राऊत, त्यांची पत्नी, मुलगा गितेश राऊत आणि ३ भोंदूबाबांवर कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी विनायक राऊत आणि त्यांचा नगरसेवक मुलगा गितेश राऊत यांच्यासह एकूण ६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच या प्रकरणी भोंदूबाबा फिरोज शेख(कोलगाव, सावंतवाडी) याला १२ जुलै रोजी रविवारी रात्री अटक करण्यात आली होती. मात्र आता ठाणे न्यायालयाने विनायक राऊत आणि गितेश राऊत यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे २३ तारखेला होणा-या सुनावणीपूर्वी विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
















