मुंबई : प्रतिनिधी
राज्यात हवामानात सतत बदल होत आहे. त्यामध्येच कालपासून जोरदार पावसाला अनेक भागात सुरुवात झाली. काल रात्री मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला. आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला.
रोहतक, वाराणसी, पुरूलिया ते ईशान्य बंगालपर्यंत ९०० मीटर उंचीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. यासोबतच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा ते बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पुणे, मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा आहे.
यासोबतच नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, जालना या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. बाकी राज्यात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. हा शेतक-यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल.
आणखी दोन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळे शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यात जून महिन्याच्या शेवटी पावसाने हजेरी लावली. जुलै महिन्यात दमदार पावसाची नोंद झाली. त्यानंतर आठ दिवस पावसाचा पत्ता नव्हता, आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढेल. इतर राज्यांतही पाऊस सुरू आहे. पावसाने उत्तरेकडील राज्यात हाहाकार माजवला आहे. त्यामध्येच राज्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
















