लातूर : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ५४ हजार ४२६ पात्र शेतक-यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतक-यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. सर्व पात्र शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’वर नोंदणी करून ‘आधार प्रमाणीकरण’ प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. शासनाने शेतक-यांची कर्ज माफीची यादी जाहिर झाल्याने शेतक-यांना यादीत आपले नाव आहे का याची अधिक उत्सुकता लागली आहे.
८९२ गावांमधील शेतक-यांना कर्जमुक्ती
पहिल्या टप्प्यात २२ जुलै रोजी जाहीर झालेल्या यादीत लातूर जिल्ह्यातील २ गावांमधील १३३ पात्र शेतक-यांचा समावेश होता. त्यानंतर आज लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ८९२ गावांमधील ५४ हजार २९३ पात्र शेतक-यांची यादी शेतकरी सभासदांच्या विशिष्ट क्रमांकासहित जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३५ हजार २३१, तर राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे १९ हजार १९५ अशा एकूण ५४ हजार ४२६ पात्र कर्जदार शेतक-यांचा समावेश आहे.
कर्जमुक्तीची रक्कम ‘डीबीटी’ प्रणालीद्वारे जमा होणार
कर्जमुक्तीच्या यादीत नाव असलेल्या सर्व पात्र शेतकरी बांधवांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार कार्ड, कर्ज खाते व बचत खात्याचे पासबुक, यादीत नावापुढे नमूद असलेला विशिष्ट क्रमांक आणि ‘अॅग्रीस्टॅक’ नोंदणी या आवश्यक कागदपत्रांसह आपली आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्यावी. अॅग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात ‘डीबीटी’ प्रणालीद्वारे कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
८८८ आपले सरकार सेवा केंद्रात सुविधा उपलब्ध
आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतक-यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठवल्या जाणार आहेत. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँकांच्या शाखांमध्येही लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आला आहे. आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असून, जिल्ह्यातील सुमारे ८८८ आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
















