दिल्ली – दिल्लीत सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या तिस-या फेरीतील चर्चेनंतर कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आंदोलन समाप्त करण्याची अधिकृत घोषणा केली. सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या बैठकीनंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. आंदोलन सुरू करताना पक्षाचे ३ प्रमुख मागण्या सरकारपुढे ठेवल्या होत्या. त्यातील पहिली मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती. सरकारने ती मान्य केल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.
याशिवाय आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यावरही सरकारने सहमती दर्शविली. भाजप किंवा त्यांच्या सहयोगी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांत विद्यार्थ्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेतले जातील. तसेच भविष्यात आंदोलकर्त्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे आश्वासन सरकारने दिले. यासोबतच नीट पेपरफुटीनंतर प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या मागणीवरही सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांबाबतही पुढील काळात संवाद सुरू ठेवू, असे आश्वासन सरकारने दिले.
सीजेपीच्या मागण्या
-शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
-२० मार्च रोजी आयोजित संसद चलो मार्चदरम्यान ्आंदोलक आणि विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे, खटले मागे घ्यावेत
-नीट पेपर फुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबीयांना १ कोटीची भरपाई देणे
















