विरार : पश्चिमेकडील डॉ. जोगळेकर रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथे प्रसूतिवेदना होत असलेल्या एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेकडे रुग्णालय प्रशासनाने केलेल्या दुुर्लक्षामुळे, प्रसूतीदरम्यान तिचे बाळ जमिनीवर पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तीव्र प्रसूतिवेदना सुरू झाल्यामुळे या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला बुधवारी विरार पश्चिमेकडील डॉ. जोगळेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीची वेळ जवळ आल्याने बाळ बाहेर येत असल्याची जाणीव होत आहे असे तिने वारंवार सांगूनही तेथील डॉक्टर आणि परिचारिकांनी तिच्या या स्थितीकडे व तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयाच्या या हलगर्जीमुळे महिला उभी असतानाच प्रसूती झाली आणि तिचे नवजात बाळ अडीच ते तीन फूट उंचीवरून थेट जमिनीवर कोसळले. या धक्कादायक घटनेत बाळाच्या डोक्यासह शरीराला गंभीर दुखापत झाली असून, त्याची प्रकृती वेगाने खालावल्याने त्याला तातडीने ठाण्यातील एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या चिमुकल्याची प्रकृती अत्यंत नाजूक आणि चिंताजनक आहे.
नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर संताप
या धक्कादायक घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीवर तीव्र संताप व्यक्त करत, जबाबदार डॉक्टर आणि कर्मचा-यांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणावर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जोगळेकर यांनी माध्यमांशी बोलणे आणि प्रतिक्रिया देणे टाळले आहे. रुग्णालयाच्या या बेजबाबदार वृत्तीमुळे आता वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.
















