लातूर : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील २२ हजार ९६३ पात्र शेतक-यांसाठी तब्बल १५९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १८ हजार ५८० शेतक-यांसाठी १२२ कोटी ७१ लाख ५५ हजार ४९ रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित प्राप्त रक्कम ही राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमधील पात्र शेतक-यांच्या कर्जखात्यांवर जमा करण्यात आली असून, अद्याप रक्कम न मिळालेल्या उर्वरित पात्र लाभार्थ्यांचा निधी लवकरच प्राप्त होणार आहे. तो निधी मिळताच संबंधित शेतक-यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही. एल. पोतंगले यांनी दिली.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ज्या शेतक-यांची कर्जे पूर्णपणे माफ होऊन खाती बेबाकी झाली आहेत, अशा शेतक-यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यांना लवकरच आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज वाटपाचा लाभ दिला जाणार आहे. शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र शेतक-यांच्या यादीत लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील एकूण ८९४ गावांमधील ५४ हजार ३८८ शेतक-यांचा समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ३५ हजार ३९७ आणि राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे १८ हजार ९९१ शेतकरी सभासदांचा त्यांच्या विशिष्ट क्रमांकासह या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापैकी जिल्ह्यातील ४० हजार ९ (७३.५६ टक्के) पात्र शेतक-यांनी आपले आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. अद्याप १४ हजार ३७९ पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे.
आधार प्रमाणीकरणानंतरच कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतक-यांची नावे पात्र शेतक-यांच्या यादीत समाविष्ट आहेत, त्यांनी विनाविलंब जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपली अॅग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. पोतंगले यांनी केले आहे. आधार प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड, कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबुक, प्रद्ध यादीत नावापुढे नमूद असलेला विशिष्ट क्रमांक आवश्यक आहे.
















