सांगली : प्रतिनिधी
सांगलीत एका मोर्चादरम्यान भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लांडगे यांच्या या विधानाचे राजकीय पडसाद उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रक्षोभक वक्तृत्च करणा-या वाचाळवीर आमदारांना वेळीच आवरा नाही तर गुन्हे दाखल करत अटक करावे अशी मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी अशा वाचाळवीर आमदारांना वेळीच आवरावे. अशा प्रक्षोभक वक्तव्यांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि जर असे झाले, तर यामध्ये नाहक सर्वसामान्य आणि निष्पाप माणूस भरडला जाईल, अशी भीती सुळे यांनी व्यक्त केली आहे.
शिवराय, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या राजकीय आणि पुरोगामी संस्कृतीची आठवण करून देताना सुळे यांनी सत्ताधा-यांना थेट इशारा दिला. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. या शिवरायांच्या महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि दडपशाहीची भाषा अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे खडे बोल सुप्रिया सुळे यांनी सुनावले आहेत.
















