लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणुक होऊन जिल्हा परिषदेत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि अपक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. लोकनियुक्त पदाधिकारी पदावर बसुन ६ महिन्यांचा काळ लोटला. परंतु, जिल्हा परिषदेतील सत्ताधा-यांमध्ये प्रत्येकजण नेता आहे. त्यामुळे कोणीच कोणाचे ऐकत नाही. परिणामी सत्ताधा-यांची प्रशासनावर पकड नसल्यामुळे विकास कामांचे तीनतेरा झाले आहेत. स्थायी समितीच्या सभागृहाला जळमटं लागली असून दस्तूरखुद्द जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या गटनेत्या सौ. आशाताई भिसे यांना हातात झाडू घ्यावा लागला.
मंगळवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा होती. त्यामुळे जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या गटनेत्या सौ. आशाताई भिसे स्थायी समितीच्या सभागृहात गेल्या होत्या. परंतु, स्थायी समितीच्या सभागृहाला मोठ्या प्रमाणात जळमट लागलेली, सभागृहात झाडूसुद्धा लावलेला नाही. सर्वत्र कचराच कचरा, पिण्यासाठी पाण्याचीसुद्धा सोय नाही, अशी सभागृहाची परिस्थिती पाहूण सौ. आशाताई भिसे यांची स्वत: हातात झाडू घेतला.
गेल्या ६ महिन्यांत सत्ताधा-यांनी त्यांना मिळालेला अधिकाराचा वापर केला नाही. परिणामी ग्रामीण जनता विकासापासून वंचित राहात आहे. जिल्हा परिषदेतील एकाही विभागाचा कारभार निटपणाने हाकला जात नाही. त्यामुळे योजनांचा फायदा जनतेला मिळत नाही. त्यासोबत अनेक अक्षेपार् गोष्टी घडत आहेत. जिल्हा परिषदेतील शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषि, महिला व बालकल्याण, पाणी पुरवठा यासह सर्वच विभागांचा कारभार मनमानीपणे सुरु आहे. सत्ताधारी मात्र अकार्यक्षमपणे हे सर्व पाहात आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपातही गोंधळ आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आहे, शाळा खोल्यांचे बांधकाम अर्धवट आहे, मुलींच्या शौचालयांची अवस्था बिकट आहे, शौचालय आहे तर पाणीच नाही, अशी अवस्था आहे. लातूर जिल्ह्यात पाऊस नाही. जल व्यवस्थापनाच्या योजनांना गती देणे अपेक्षीत असताना त्याबाबत काहींच निर्णय घेतला गेला नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशन या दोन विभागात गोंंधळाचे वातावरण आहे.
















