परभणी : परभणी- मानवत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर भोगाव पाटीजवळ दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी अॅक्टिव्हा आणि पॅजो ऑटोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात अॅक्टिव्हावरील १७ वर्षीय युवक ठार झाला. त्याच्यासोबत प्रवास करणारी ४० वर्षीय महिला जखमी झाली आहे. रस्त्यावरील खड्डा चुकविताना हा अपघात घडल्याचे पोलिसांच्या पाहणीत समोर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कृष्णा बालाजी पोंदाळ (वय १७, रा. मानवत) हा अॅक्टिव्हा (क्र.एमएच २४ एआर ४६७१) वरून मानवतकडून परभणीच्या दिशेने जात होता. त्याच्यासोबत सारिका बालाजी पोंदाळ (वय ४०) प्रवास करत होत्या. सकाळी ७.३०च्या सुमारास भोगाव पाटीजवळील पुलावर ते आले असता रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविण्याचा प्रयत्नात परभणीहून मानवतकडे येणा-या ऑटो (क्र. एमएच २२ एएन २६९८) सोबत त्यांच्या गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कृष्णा पोंदाळ जागीर ठार झाला, तर सारिका पोंदाळ या जखमी झाल्या.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र परभणीचे सपोनि. शिनगारे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी केलेल्या घटनास्थळाच्या पाहणीत अपघात झालेल्या ठिकाणी पुलाला भेगा पडल्याचे आढळून आले. या अपघातामुळे महामार्गावरील रस्त्यांची दुरवस्था आणि पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
















