मुंबई : प्रतिनिधी
संतोष डावखर दिग्दर्शित गोंधळ या मराठी थ्रिलर चित्रपटाची ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी याबद्दल माहिती दिली. निवड समितीचे अध्यक्ष पी. शेषाद्री यांनी सांगितले की, ऑस्कर २०२७ साठीच्या ३३ चित्रपटांच्या यादीतून या चित्रपटाची निवड करण्यात आली. गोंधळ सिनेमाच्या ऑस्कर प्रवेशामुळे मराठी सिनेसृष्टीचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, बॉक्स ऑफिसवर गाजलेला हिंदी चित्रपट धुरंधर आणि यंदाचा चर्चेतील चित्रपट हनुमान अंश यांना मागे टाकत गोंधळ या चित्रपटाची निवड झाली आहे.
९९ वा अकादमी पुरस्कार सोहळा १४ मार्च २०२७ रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. ९९ व्या अकादमी पुरस्कार सोहळ््यात गोंधळ चित्रपट बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या श्रेणीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दिग्दर्शक संतोष डावखर यांना २०२५ मध्ये झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये सिल्व्हर पीकॉक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारताच्या ऑस्कर एन्ट्रीसाठी यंदा एकूण ३३ चित्रपट स्पर्धेत होते. यामध्ये १४ हिंदी, प्रत्येकी ४ मराठी, तेलुगु आणि गुजराती, तीन तमिळ तर प्रत्येकी एक मल्याळम आणि नागामीज भाषेतील चित्रपटाचा समावेश होता. याशिवाय एका मूक चित्रपटाचाही स्पर्धेत समावेश होता.
या चित्रपटांमधून अंतिम निवड करण्याची जबाबदारी परीक्षक मंडळावर होती. या ज्युरीमध्ये पी. शेषाद्री, विजय पाटकर, हुतू कनोडिया, शांती कुमार, संदीप पराशर, संजय पाटील, साबू जोसेफ, अनिल थॉमस, विवेक वासवानी, बिजोन दासगुप्ता, हसन, वासन आणि तनिष्ठा चॅटर्जी यांचा समावेश होता. या परीक्षक मंडळाने अनेक चर्चेतील चित्रपटांशिवाय गोंधळसारख्या मराठी थ्रिलर चित्रपटाची निवड केली. हा ख-या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव आहे.
गोंधळ हा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला एक बहुचर्चित मराठी थ्रिलर-ड्रामा चित्रपट आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला, श्रद्धा आणि एकाच रात्रीत घडणा-या गूढ रहस्यावर या सिनेमाची कथा आधारित आहे. लग्नाआधी घातल्या जाणा-या पारंपरिक गोंधळ विधीच्या पार्श्वभूमीवर एका रात्रीत घडणा-या नाट्यमय आणि थरारक घटनांवर ही कथा फिरते. लोककला, श्रद्धा आणि त्यामागे दडलेले रहस्य याचे प्रभावी चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे.
११ वर्षांपूर्वी कोर्टला
मिळाली होती संधी
११ वर्षांपूर्वी ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवडले गेले होते. त्यानंतर आता ‘गोंधळ’च्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि मराठी चित्रपटसृष्टीला ऑस्करच्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा, भावनिक आणि ऐतिहासिक आहे, असेच म्हणावे लागेल.
अत्यंत दर्जेदार, चर्चित
चित्रपटांना टाकले मागे
‘डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर -१, ‘धुरंधर -२ ’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देऊळबंद २’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ यांसारखे विविध भाषांतील अनेक दर्जेदार आणि चर्चित चित्रपट भारताच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशाच्या शर्यतीत होते. काही चित्रपटांना आंतरराष्ट्रीय महोत्सवांची पार्श्वभूमी होती, तर ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांमागे भव्य निर्मितीमूल्य, मोठे कलाकार आणि प्रचंड व्यावसायिक ताकद होती.
















