मुंबई : रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई सुरू आहे. या चित्रपटासमोर बॉलिवूड आणि तेलुगू सिनेसृष्टीतील नव्या चित्रपटांची कामगिरीही फिकी पडताना दिसत आहे. शुक्रवारी ‘जेलर २’ने जितकी कमाई केली, तितकी कमाई इतर सर्व चित्रपटांना एकत्र येऊनही करता आली नाही.
शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांना प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, रजनीकांत यांचा नवा चित्रपट ‘जेलर २’ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. ‘टायगर’ मुथुवेल पांडियन यांच्या भूमिकेतील रजनीकांत यांचा अभिनय चांगलाच गाजला होता. या सिक्वेलमध्ये त्यांच्या भूमिकेचा प्रभाव आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
वयाच्या ७५ व्या वर्षीही रजनीकांत यांनी ‘जेलर २’च्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. कामकाजाच्या दिवशी त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १२५ कोटी रुपयांची ओपनिंग घेतली. चाहत्यांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. मात्र, शुक्रवारी ‘जेलर २’च्या कमाईत मोठी घसरणही झाली.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, या तमिळ सुपरस्टारच्या चित्रपटाने दुस-या दिवशी भारतात ३५.६० कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये सर्वाधिक योगदान तमिळ भाषेतील प्रदर्शनाचे होते. हिंदी भाषेत चित्रपटाचे शो कमी असल्यामुळे या भाषेतून केवळ २.७५ कोटी रुपयांची नेट कमाई झाली.
दोन दिवसांत ‘जेलर २’ने एकूण ९५.३० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. जगभरातही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. शुक्रवारी परदेशातील बॉक्स ऑफिसवर रजनीकांत यांच्या चित्रपटाने ४० कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले. त्यामुळे चित्रपटाची एकूण कमाई आता २०० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. सध्या या तमिळ सुपरस्टारसमोर अनेक नामांकित कलाकारांचे चित्रपट फिके पडताना दिसत आहेत.
















