छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून पेटलेला राजकीय वाद आता थेट न्यायालयाच्या पाय-यांपर्यंत पोहोचला असून, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यावर तब्बल ४ तास हाय-व्होल्टेज सुनावणी पार पडली. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या चार संचालकांच्या निर्णयाला आणि अध्यादेशाला स्थगिती देण्याची विरोधकांची याचिका सुटीकालीन न्यायाधीश नीरज धोटे यांनी फेटाळून लावली. त्यामुळे मंगळवारी गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक ठरल्यानुसारच होणार आहे. त्यामुळे महायुतीचाच अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु स्वीकृत सदस्यांचे मतदान स्वतंत्र घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. आता पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे.
औरंगाबाद खंडपीठाने सुनावणीअंती महत्त्वाचे निर्देश जारी केले. मंगळवारची अध्यक्षपदाची निवडणूक सुरळीत पार पडेल. शासनाने नियुक्त केलेले चारही संचालक या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील; परंतु त्यांचे मतदान हे वेगळ््या पेटीत घेतले जाईल. तसेच संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हीडिओ चित्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणुकीचा निकाल जरी जाहीर झाला तरी ही संपूर्ण प्रक्रिया आणि अंतिम निकाल हा न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीनच राहील, असे आदेश देत न्यायालयाने पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी निश्चित केली आहे.
या हाय-प्रोफाइल प्रकरणात दोन्ही बाजूंकडून देशातील नामांकित कायदेतज्ज्ञांनी किल्ला लढवला. याचिकाकर्ते शशिकांत पाटील चुवेकर यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ज्ञ डॉ. अभिषेक मनू सिंघवी आणि अॅड. आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडताना शासनाची ही चार संचालकांची नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा केला तर राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी विविध कायदेशीर संदर्भ देत कोरम पूर्ण करण्यासाठी शासनाने केलेले हे पाऊल पूर्णपणे कायदेशीरच असल्याचा घणाघाती युक्तिवाद केला.
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता शिरगाव येथील प्रधान कार्यालयात निवड सभा होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडेल. गोकुळमध्ये राजर्षी शाहू समविचारी आघाडीकडे १३ तर महायुतीकडे १२ संचालक आहेत. मात्र, अध्यक्षांच्या निवडीसाठी किमान १४ संचालकांच्या कोरमची गरज आहे. त्यामुळे या आधी २९ ऑक्टोबरची सभा रद्द झाली होती. आता उद्या यावर मतदान होणार आहे.
















