नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली. या संवादात झेलेन्स्की यांनी युद्धातील ताज्या घडामोडींबाबत आपली भूमिका मांडली. तर पंतप्रधान मोदी यांनी भारताची मानवकेंद्रित भूमिका स्पष्ट करत, युद्धाचा प्रश्न केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच सोडवला जाऊ शकतो, असे अधोरेखित केले. शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, असेही म्हटले.
पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी भारत आणि युक्रेनमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबतही चर्चा केली. परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला.
संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच शांततेचा मार्ग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या चर्चेची माहिती दिली. झेलेन्स्की यांनी युद्धातील ताज्या घडामोडी, त्याचे मानवी परिणाम आणि शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत आपले विचार मांडल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे आभार मानले.
भारताची भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले की, युद्धाचा शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारत सर्वतोपरी योगदान देण्यास कटिबद्ध आहे. भारताचा दृष्टिकोन नेहमीच मानवकेंद्रित राहिला असून, संघर्षाचा शेवट संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच झाला पाहिजे, ही देशाची ठाम भूमिका आहे.
अबू धाबीतील चर्चेपूर्वी मोदी-झेलेन्स्की संवाद
मोदी आणि झेलेन्स्की यांच्यातील ही चर्चा अबू धाबी येथे होणाऱ्या अमेरिका, रशिया आणि युक्रेन यांच्यातील त्रिपक्षीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर झाली. दरम्यान, पीएम मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर झेलेन्स्की यांनी म्हटले की, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यांना राजनैतिक परिस्थितीबद्दल माहिती दिली. अबू धाबी येथे होणाऱ्या बैठकीच्या अजेंड्यावरील प्रत्येक विषयावर आम्ही सक्रियपणे तयारी करत आहोत. युक्रेनने नेहमीच रचनात्मक दृष्टिकोन ठेवला आहे आणि रशियाकडूनही तणाव कमी करण्याची तशीच तयारी अपेक्षित आहे.
















