मुंबई : घरखर्चावरुन होर्णाया भांडणातून रागाच्या भरात एका तरुणाने त्याच्याच वृद्ध आईची बेदम मारहाण करुन हत्या केली. हल्ल्यात जखमी झालेल्या साधना भोलेनाथ कारंडे या ६२ वर्षांच्या महिलेचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बांगुरनगर पोलिसांनी आता आरोपी मुलगा अभिषेक भोलेनाथ कारंडेवर (२८) हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
साधना तिच्या पती आणि मुलांसोबत गोरेगाव येथील लक्ष्मीनगर, महाकाली मंदिरामागील पुर्नवासी गल्लीतील रुम क्रमांक सातमध्ये राहत होती. गेल्या वर्षी तिला अर्धांगवायू झाल्याने ती घरीच असते. तिचा मोठा मुलगा प्रथमेश हा राजस्थान येथे राहत असून अभिषेक हा तिचा लहान मुलगा आहे. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. त्यातून तो घरात शिवीगाळ करुन सर्वांशी वाद घालण्याचा प्रयत्न करत होता. गेल्या आठवड्यात प्रथमेश दिवाळी सणानिमित्त मुंबईत आला होता.
















