मुंबई : प्रतिनिधी
बाळासाहेबांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार आणि ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा मूलमंत्र शिवसेना आजही तितक्याच निष्ठेने आणि ताकदीने जपत आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे सरकार सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत असून, समाजकारणाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रिगल सिनेमासमोरील शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे वरिष्ठ नेते, उपनेते, मंत्री, खासदार, आमदार तसेच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्ता हा घरात बसण्यासाठी नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठी मैदानात उतरला पाहिजे, ही बाळासाहेबांची शिकवण होती.
त्याच विचारातून दुष्काळग्रस्त भागांत शिवसैनिक शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असून, संकटात त्यांना मदतीचा हात देत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. जिथे संकट, तिथे शिवसेना आणि जिथे आपत्ती, तिथे शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेला सेवाभावाचा मंत्र प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सुरू आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांना मदत करण्यासाठी शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, अशा सूचना देण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
शेतक-यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, असा शब्द सरकारने दिला होता. त्यानुसार तातडीची पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असून, शिवसेनेच्या वतीनेही शेतक-यांना दिवाळी मदत पोहोचविण्यात आली आहे. शेतक-यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार यापुढेही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
विरोधकांनी मदतीच्या मुद्यावर राजकारण करू नये
राज्यात शेतक-यांच्या मागणीनुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, मंत्रिमंडळातील सदस्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दुष्काळग्रस्तांना १२ प्रकारच्या सवलतींसह नुकसानभरपाईचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे अग्रिम मदतीच्या मुद्यावरून विरोधकांनी राजकारण करण्यापेक्षा शेतक-यांच्या मदतीसाठी पुढे यावे. हा आरोप-प्रत्यारोपांचा नव्हे, तर संकटग्रस्त शेतक-यांना आधार देण्याचा काळ आहे असे आवाहनही शिंदे यांनी केले.
















