रांदड कुटुंबीयांचे अभिनंदन व यशस्वी वाटचालीस शुभेच्छा
लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील हत्तेनगर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्टुडिओ व्हीआरप्लसए आर्किटेक्ट्स अँड डिझायनर्स या वास्तूरचना व इंटिरिअर डिझाईन क्षेत्रातील कार्यालयाचा शुभारंभ बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
प्रारंभी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व फित कापून कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. स्टुडिओ व्हीआरप्लसए ही संस्था लातूर आणि पुणे येथे कार्यरत असून वास्तूरचना अंतर्गत सजावट आणि नियोजन या क्षेत्रांत विविध प्रकारच्या सेवा पुरविणार आहेत. निवासी, व्यावसायिक, हॉस्पिटॅलिटी तसेच मिश्र वापराच्या इमारतींच्या प्रकल्पांचे डिझाईन व नियोजन करण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाणार आहे.
यावेळी आमदार अमित देशमुख म्हणाले की, आज आपल्या व्हीआरप्लसए आर्किटेक्ट्स अँड डिझायनर्स या फॉर्मचा शुभारंभ करताना त्यांची पाहणी करताना देशमुख कुटुंबीय व रांदड कुटुंबीय या दोन परिवारातील प्रेमाचा ओलावा जाणवला. आपल्या कुटुंबातील एका तरुणाने उच्च शिक्षण घेऊन या क्षेत्रात कामाची सुरुवात केली आणि माणसाच्या मनात जिद्द असली की आपल्या मनासारखे शिखर नक्कीच गाठता येते आणि यासाठी लागणारी ऊर्जा वेदांत रांदडमध्ये पाहायला मिळते, याचा अभिमान वाटतो, असे म्हणत आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनुभव माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी उपस्थितांना सांगितले.
लातूरचा विस्तार दिवसेंदिवस झपाट्याने होत असून आपल्या इमारती बांधताना कायद्याच्या चौकटीत राहून बांधकाम करावे, जेणेकरून भविष्यात कुठलीही अडचण येऊ नये, इमारतीत वास्तव्यास असणा-या कुटुंबांची सुरक्षा राखली जावी, इमारतीत वाहन तळ, आगीच्या घटनांना रोखण्यासाठी आवश्यक फायर फायटिंग सुविधा असावी अन्यथा लातूर मनपाला अतिक्रमण व नियमबा बांधकाम दाखवत आपल्यावर कार्यवाही करण्याची वेळ येईल आणि तशी वेळ येऊ नये, याकडे कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील लोकांनी काळजीपूर्वक पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
स्टुडिओ व्हीआरप्लसए आर्किटेक्ट्स अँड डिझायनर्स या वास्तूरचना व इंटिरिअर डिझाईन क्षेत्रातील कार्यालयाच्या शुभारंभाबद्दल माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी स्टुडिओच्या सर्व टीमला नव्या वाटचालीस शुभेच्छा देत आर्किटेक्ट वेदांत रांदड यांचे अभिनंदन केले व व्यवसायाच्या वृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, प्रास्ताविकात स्टुडिओचे संस्थापक व प्रमुख डिझायनर आर्किटेक्ट वेदांत रांदड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याची तसेच उपलब्ध सेवाबद्दल सुविधांची माहिती दिली.
यावेळी सचिन बंडापल्ले, अॅड. समद पटेल, व्यंकटेश पुरी, लक्ष्मीकांत कर्वा, डॉ. चेतन सारडा, बजरंगलालजी रांदड, रामानुज रांदड, वेदांत रांदड, उदय पाटील, प्रकाश कासट, संतोष हाते, जयेश बजाज, विजय रांदड, विष्णू मदने यांच्यासह रांदड कुटुंबीय, वास्तूरचना, बांधकाम आणि व्यावसायिक क्षेत्रातील लातूरसह परिसरातील मान्यवर, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















