जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन धिरज देशमुख यांची ग्वाही
लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत सुज्ञ मतदारांनी आमच्या ‘सहकार पॅनल’ला स्पष्ट बहुमत दिले. या निवडणुकीत आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. आगामी काळात तो पूर्ण करू, असे प्रतिपादन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी समाजमाध्यमाशी संवाद साधताना केले.
प्रत्येक निवडणूक आपल्या पद्धतीने लढायची असते. आपण काय केले आणि काय करू पाहतो, यावरून लोक आपल्याला मतदान करतात, असे नमूद करून धिरज देशमुख म्हणाले की, गोकुळमध्ये आकड्यांचा खेळ झाला. मात्र आम्हाला आमच्या ‘सहकार पॅनल’ला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आकड्यांच्या खेळाला सामोरे जावे लागणार नाही. मतदारांनी सहकार पॅनलवर जो विश्वास दाखविला आहे, त्याला तडा जाऊ न देता शेतक-यांच्या हितासाठी सदैव काम करताना जनहितासाठी आम्ही जाहीर केलेल्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी केली जाईल. हा जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पुस्तकाविषयी धिरज देशमुख म्हणाले, ज्या लोकांनी हे पुस्तक फाडले ती राजकीय स्टंटबाजी आहे. कोणी पुस्तक वाचावे, कोणी नाही, हा ज्यांचा-त्यांचा प्रश्न आहे, लोक पुस्तक वाचत आहेत. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. त्याबद्दल धिरज देशमुख म्हणाले, त्या कार्यक्रमादरम्यान जे भाष्य केले, ते सर्वधर्मसमभाव आणि ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला आहे, त्याच्यावर ते बोलले असावेत. उगीच एखाद्या मुद्दावर एकाकी पाडण्याचे काम होऊ नये.
















