नवी दिल्ली : एका हिंदू व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणा-या एका मुस्लीम विवाहित महिलेला सुरक्षा पुरवण्यास अलाहाबाद हायकोर्टाने नकार दिला. कायद्यानुसार विवाहित मुस्लीम महिला शरियतनुसार कोणत्या अन्य व्यक्तीसोबत किंवा हिंदू व्यक्तीसोबत राहू शकत नाही. शरियतनुसार, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणे व्यभिचार आणि हराम आहे असे कोर्टाने म्हटले.
महिलेने आपल्या आणि प्रियकराच्या जिवाला वडील आणि नातेवाईकांकडून धोका असल्याचे म्हणत सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. या याचिकेला कोर्टाने फेटाळले आहे. न्यायमूर्ती रेनू अग्रवाल यांच्या पीठाने म्हटले की, महिलेच्या गुन्हेगारी कृत्याला कोर्टाकडून समर्थन आणि संरक्षण दिले जाऊ शकत नाही. महिलेने धर्म परिवर्तनासाठी कोणताही अर्ज केला नाही किंवा पतीपासून वेगळी झालेली नाही. त्यामुळे तिला संरक्षण दिले जाऊ शकत नाही.
महिलेने आपल्या पतीपासून तलाक घेतल्याचा कोणताही कायदेशीर पुरावा मिळवलेला नाही. तरी महिला लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती. महिला मुस्लीम कायदा शरियतचे उल्लंघन करत परपुरुषासोबत राहत आहे. इस्लाम कायद्यानुसार, महिला लग्न झालेले असताना दुस-यासोबत संबंध निर्माण करु शकत नाही. महिलेच्या अशा कृत्याला व्यभिचार आणि हराम अशा व्याख्येमध्ये गणले जाते, असे कोर्ट म्हणाले.
माहितीनुसार, महिला याचिकाकर्त्याचे लग्न मोहसिन शेख सोबत झाले होते. दोन वर्षापूर्वी त्याने दुसरे लग्न करुन दुस-या पत्नीसोबत राहण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर याचिकाकर्ती महिला आपल्या माहेरी राहण्यास आली. पण, पती आणि सासरच्यांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याने ती एका हिंदू व्यक्तीसोबत राहू लागली.