कोलकाता : लाच घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याच्या आरोपांनी घेरलेल्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांना ममता बॅनर्जी यांनी नवी जबाबदारी दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी मोईत्रा यांची कृष्णानगर (नदिया उत्तर) जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. खासदार महुआ यांनी या नव्या जबाबदारीबद्दल पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या की, मला कृष्णनगर (नदिया उत्तर) जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केल्याबद्दल ममता दीदी आणि तृणमूल काँग्रेसचे आभार. कृष्णनगरच्या लोकांसाठी आणि पक्षाचे मी नेहमीच काम करेन.
संसदेच्या नीतिशास्त्र समितीने तपास पूर्ण केल्यानंतर लाच घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी महुआविरोधात १० नोव्हेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अहवाल पाठवला आहे. आता याप्रकरणी पुढे काय कारवाई करायची याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष घेणार आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी १५ ऑक्टोबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. त्यात महुआ यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप केला होता. महुआचे माजी साथीदार आणि वकील जय अनंत देहद्राई यांनी लिहिलेल्या पत्राच्या आधारे दुबे यांनी हे आरोप केले आहेत.