नवी दिल्ली : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही जणांनी जायकवाडीत पाणी सोडण्यावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी एकत्रित सुनावणी घेण्यात आली. यावर सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडीला पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता उत्तर महाराष्ट्रातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडी धरणात ८.५ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निर्णय कायम ठेवला आहे.
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणि माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी जायकवाडी धरणात नाशिक व नगरच्या धरणांमधून पाणी सोडावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल केले होते. त्यावर आज सुनावणी झाली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने ३० ऑक्टोबर २३ रोजीच्या कार्यालयीन आदेशाने, उर्ध्व गोदावरी खो-यातील धरण समूहातील जलाशयमधील पाणी पैठण धरणात सोडण्यासाठीचे आदेश पारित केले होते. त्याअनुषंगाने मराठवाड्याला हक्काचे ८.६ टी. एम. सी. पाणी सोडण्यात येणार होते.