नांदेड : प्रतिनिधी
सतत वर्दळीचे ठिकाण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकात फुटलेल्या बॉटलने एका इसमास भोसकण्यात आले आहे. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी पोलिस व मॅक्सो कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने शासकीय रुग्णालयात नेले आहे. हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शहरातील वजीराबाद भागात मध्यवर्ती बसस्थानक आहे. या बसस्थानकात प्रवाशांची गर्दी असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीने एका इसमाच्या पोटात अर्ध्या फुटलेल्या बॉटलने भोसकले. त्याच्या पोटातून रक्तस्राव होत होता व तो गंभीर जखमी झाला होता. मात्र बसस्थानकातील अधिकारी व कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेत होते.
तेथील प्रवाशापैकी एकाने आवाज उठविल्याने, पोलिस व मॅस्कोच्या सुरक्षारक्षकाने त्या पीडित व्यक्तीस ऑटोमध्ये बसवून अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले. याबाबतचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ही ३ दिवसांपूर्वीची घटना आहे. रेल्वे स्थानकावर तो नशा करणारा व्यक्ती होता. त्याने स्वत:च पोटात अर्धी फुटलेली बॉटल मारून घेतली आहे. याप्रकरणाची नोंद वजीराबाद पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.
















