एक चहा, मतं फिरवणार?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर येथे सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने यांच्या घरी जाऊन चहापान केले. प्रवीण माने हे सुप्रिया सुळे गटातील मानले जातात. ते इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते. मात्र चहापानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रवीण माने जर अजित पवारांसोबत गेले तर इंदापुरात सुप्रिया सुळे यांना फटका बसू शकतो. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर फडणवीसांनी इंदापूरमध्ये आणखी एका अजित पवार विरोधकाला आपल्या बाजूने वळवल्यास लोकसभेला सुनेत्रा पवार यांना इंदापूरमधून मोठी आघाडी मिळू शकते.
…………………………………
पाटील-महाजनांत गुफ्तगू
उन्मेश पाटील यांनी भाजपला ‘रामराम’ करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर भाजपचे युवानेते व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. माजी खासदार ए. टी. पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट घेत भाजप कार्यालयातच बंद दाराआड चर्चा केल्यामुळे उमेदवारीबाबत पुन्हा एकता उत्सुकता निर्माण झाली आहे. माजी खासदार पाटील यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत तळ ठोकून आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. आता पुन्हा ते सक्रिय झाले आहेत. मात्र, दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.
…………………………………………
‘इंजिन’ला कल्याणचा थांबा!
कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप व शिवसेना श्ािंदे गटाकडून दावा केला जात असतानाच या मतदारसंघात मनसेच्या इंजिनला थांबा मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. येत्या पाडव्याला राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच याविषयी व्हायरल होत असलेल्या संदेशामुळे पाडव्याला राज ठाकरे मुहूर्त साधणार का? असे ही बोलले जात आहे. त्यामुळे आता कल्याणात उबाठा गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर – राणे व मनसेच्या राजू पाटलांमध्ये थेट लढत होणार अशी शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसात यावर शिक्कामोर्तब होईल.
…………………………………………..
दाढी करतो, मतं द्या!
राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी काढतात. अनेक बडे नेते, अभिनेते उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येतात. मात्र, या निवडणुकीच्या धामधुमीत एका अपक्ष उमेदवारांचा स्वत:चा प्रचार करतानाचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तमिळनाडू येथील रामेश्वरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत उभा असलेला अपक्ष उमेदवार एका सलूनमध्ये जातो आणि तिथे लोकांचे केस कापून देतो आणि दाढी करून देतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवाराने एका सलूनला भेट दिली. सलूनमध्ये शिरताच या उमेदवाराने हातात थेट वस्तारा घेतला, आणि दाढी करण्यास सुरूवात केली.
…………………………………..
पक्वान्न सोडले, पत्रावळीवर बसले
‘यांच्यापेक्षा श्ािंदे बरे, निदान आपल्या लोकांसाठी भांडत तरी आहेत. काहीतरी मिळवतायत, यांनी काय मिळवलं? पंचपक्वान्नाचं ताट सोडून पत्रावळीवर जाऊन बसलेत’. संजय निरूपम, भावना गवळी यांच्याबाबत मी बोलणार नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. भाजपला शरद पवारांना संपवायचंय, त्याशिवाय यांचे जातीय राजकारण इथं टिकणार नाही’, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.