नांदेड : शहरातील खडकपुरा भागात असलेल्या मस्जिदीचे नायब मुतवले यांच्या खून प्रकरणातील ५ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व वजीराबाद पोलिसांच्या १४ पथकानी अवघ्या ४ तासात अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथून अटक केली. खडकपुरा येथील दर्गा हजरतशहा रहेमान व दुल्हेशहा रहेमान मस्जिदीचे नायब मुतवली म्हणून शेख शमीम शेख इसाक (रा. खडकपुरा ) यांचा २१ जून रोजी मध्यरात्री जुनी केस मागे घेण्याच्या कारणावरून ५ जणांनी गोळीबार आणि शस्त्राने वार करून खून केला होता.
गुन्हा दाखल होताच जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, वजीराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या विविध पथकांनी शोध मोहिम राबविली. यानंतर अवघ्या ४ तासात खुनातील आरोपी मिर्झा शब्बीर बेग गफार बेग, ऋषिकेश अनिल घुले, सय्यद सुफियान सय्यद जमीर, माधव भगवान कांबळे व मुस्ताक अहमद इसाक अहमद यांना गजाआड केले.
















