नांदेड : प्रतिनिधी
अधार्पूर व मुदखेड शहरात अवैध विक्री तथा वाहतूक करण्याकरिता निर्दयपणे बांधून ठेवलेल्या ३५ गोवंशची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी त्या त्या पोलिस ठाण्यात ५ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत अधार्पूर शहरातील इंदिरानगर, आयटीआयच्या पाठीमागे, आखाड्यावर व दर्गा गल्ली येथे छापा टाकण्यात आला. या सर्व ठिकाणी अवैध विक्री व वाहतूक करण्याकरिता २० गोवंश (५ लाख १७ हजार रुपये )ना निर्दयपणे बांधून ठेवण्यात आले होते. त्यांची सुटका करून आरोपी युनूस खान बाबू खान,जमील खान, अब्दुल समिद अब्दुल नयुम रा. सर्व अर्धापूर व सन्नाउल्लाखान अब्दुल्ला खान, हाजी सरदार (रा. देगलूर नाका, नांदेड यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, मुदखेडचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण व त्यांच्या पथकाने मुदखेड शहरातील आयटीआय शेजारील शेतात व इस्लामपुरा भागात छापा टाकला. त्या ठिकाणी निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या अवस्थेत १५ गोवंश (१ लाख ५७ हजार रुपये) आढळले. त्या गोवंशची सुटका करून याबाबत चौकशी करून पुढील कारवाई प्रक्रिया मुदखेड पोलीस करीत आहेत.
















