27.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेसोबतची युती तुटली, महाविकास आघाडीला २६ मार्चचा अल्टिमेटम

शिवसेनेसोबतची युती तुटली, महाविकास आघाडीला २६ मार्चचा अल्टिमेटम

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीबाबत चर्चा सुरू होण्यापूर्वी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांनी युती करण्याची घोषणा केली होती; पण महाविकास आघाडीसोबतच्या जागावाटपात शिवसेनेकडून मित्रपक्ष म्हणून आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत शिवशक्ती आणि भीमशक्तीची आघाडी आता राहीलेली नाही, असे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा वाद २६ मार्चपर्यंत मिटला नाही तर वंचितला भूमिका घ्यावी लागेल, असा अल्टिमेटमही आंबेडकर यांनी या वेळी दिला.

आज एका पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवशक्ती-भीमशक्ती युती आता शिल्लक राहिलेली नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेशी युती करताना महाविकास आघाडीत जायचे असेल तर प्रथम आमच्यात बोलणी झाली पाहिजे. त्यामध्ये दोन्ही पक्षांची रणनिती आणि जागावाटप ठरले पाहिजे. मग आघाडीत बोलता येईल, ही आमची भूमिका होती. त्यापैकी कोणत्याच गोष्टी झाल्या नाहीत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना स्वतंत्रपणे चर्चा करीत आहे त्यामुळे आता आमची युती नाही, असे आंबेडकर यांनी सांगितले.

महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले, भाजपाला पराभूत करणे हेच आमचे लक्ष्य आहे त्यामुळे छोटे-मोठे हेवेदावे आम्ही बाजूला ठेवले आहेत; परंतु आघाडीत १५ जागांवर अजूनही वाद सुरू आहे. आघाडीने आम्हाला सहकार्य केले असते तर जागावाटपाचे घोंगडे भिजत पडले नसते. आम्हाला चार नाही तर तीनच जागा दिल्या होत्या. त्यामध्ये एक अकोला होती. ती आम्ही त्यांना परत घ्यायला लावली त्यामुळे आमच्याकडे दोनच जागा त्यांनी दिल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) यांच्यातील वाद मिटत नाही तर मग आघाडीत कशाला जायचे? असा सवाल करताना, त्यांच्यातील जागावाटपाचा वाद संपण्याची आम्ही वाट पाहत आहोत. २६ मार्चपर्यंत पाहून त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत, असे आंबेडकर यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR