39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeराष्ट्रीयहोळीपासूनच तापमानाचा पारा ४० अंशांवर!

होळीपासूनच तापमानाचा पारा ४० अंशांवर!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षांमध्ये ऋतूंची गुंतागुंत झाल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हाळ््यात गारवा, हिवाळ््यात पाऊस, पावसाळ््यात ऊन असे वातावरणात मोठे बदल दिसून आले आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा बदल झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. पुढील आठवड्यात आता वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये ऐन होळीच्या दरम्यान काही राज्यांत तापमान थेट ४० अंशांवर पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे.

१९७० पासून संपूर्ण भारतभर मार्च व एप्रिल या महिन्यांत उष्णतेचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी काही राज्यांत होळीच्या आसपास तापमान ४० अंश सेल्सिअस ओलांडण्याची उच्च शक्यता आहे. १९७० मध्ये हे दृश्य वेगळे होते, असे एका अभ्यासात सांगण्यात आले आहे. हा अभ्यास अमेरिका येथील क्लायमेट सेंट्रलमधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने केला. अभ्यासासाठी या गटाने १ जानेवारी १९७० ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत दररोजचे तापमान तपासले आहे. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, मार्चमध्ये भारतातील उत्तर आणि पश्चिम भागात १९७० च्या तुलनेत सर्वांत जास्त तापमानवाढ झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सरासरी तापमानात २.८ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात संपूर्ण भारतात एकसारखी तापमानवाढ झाली आहे. मिझोरममध्ये १९७० पासून अंदाजे १.९ अंश सेल्सिअसची सर्वांत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे.

होळीच्या आसपासच्या दिवसांतील तापमानावर लक्ष केंद्रित केल्यास अभ्यासात असे आढळून आले की, १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला महाराष्ट्र, छत्तीसगड व बिहार या तीन राज्यांमध्ये मार्चच्या उत्तरार्धात ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता पाच टक्के होती. सध्या या संख्येत ९ राज्यांचा समावेश झाला आहे. तीन मूळ राज्यांसह राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा व आंध्र प्रदेशमध्येही ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानवाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात तापमानवाढ होण्याची शक्यता तब्बल १४ टक्के आहे. संशोधकांनी भारतातील ५१ शहरांचेही परीक्षण केले.

हरितगृह वायूचा परिणाम
मार्च व एप्रिल या महिन्यांत तापमानवाढ होण्यामागील मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. औद्योगिक क्रांतीनंतर हरितगृह वायू परिणामामुळे जागतिक तापमानात वाढ झाली आहे. जगाचे वार्षिक सरासरी तापमान १८५०-१९०० या कालावधीतील सरासरी तापमानापेक्षा १.१ अंश सेल्सिअसने वाढले असून, भारतीय उपखंडातील वार्षिक सरासरी तापमान १९०० पासून ०.७ अंश सेल्सिअसने वाढले आहे.

डोंगराळ राज्यांना फटका
ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. विशेषत: भारतातील डोंगराळ राज्यांना याचा फटका बसत आहे. मार्च-एप्रिलमधील उष्ण हवामानामुळे उष्णतेशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आतापासूनच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR