तेहरान : अमेरिका आणि इराण दरम्यान अत्यंत महत्त्वाचा १४ कलमी शांतता करार होऊन अवघा एक आठवडा उलटत नाही तोच जगातील सर्वांत महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एका आंतरराष्ट्रीय मालवाहू जहाजावर हल्ला झाला आहे. ओमानच्या दाहीत बंदरापासून आग्नेयेला ७.५ सागरी मैलांवर हा हल्ला झाला. या ताज्या हल्ल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने तेथे अडकलेल्या ११ हजारांहून अधिक खलाशांची सुटका करण्याची मोठी मोहीम तडकाफडकी स्थगित केली आहे. अमेरिकन अधिका-यांनी या हल्ल्यामागे थेट इराणचा हात असल्याचा आरोप केला आहे. यामुळे आखाती देशांत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ब्रिटिश सागरी सुरक्षा संस्था यूकेएमटीओने दिलेल्या वृत्तानुसार, सिंगापूरचा ध्वज असलेल्या एव्हर लव्हली या मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि जहाजाचे किरकोळ नुकसान होऊनही त्यांनी प्रवास सुरू ठेवला, असे सागरी जोखीम व्यवस्थापन कंपनी व्हॅनगार्डने सांगितले. मरीन ट्रॅफिक या शिप-ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, या जहाजाने गुरुवारी सकाळी दक्षिण मार्गाने होर्मुझच्या सामुद्रधुनीत प्रवेश केला होता आणि स्थानिक वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता ते पूर्व बाजूने बाहेर पडले. या हल्ल्यानंतर आयएमओचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेझ यांनी तातडीने निवेदन जारी करत सुटका मोहीम थांबवल्याचे जाहीर केले.
खलाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च
खलाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. काही जहाजांची सुटका करण्यात आली होती, मात्र सुरक्षेची पूर्ण खात्री मिळेपर्यंत ही मोहीम स्थगित राहील. हल्ला झालेले जहाज युएनच्या सुटका आराखड्याच्या अंतर्गत प्रवास करत नव्हते, मात्र खबरदारी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे असे ते म्हणाले.
मोठी सुटका मोहिम राबवावी
फेब्रुवारी महिन्यापासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण अशा थेट युद्धामुळे शेकडो जहाजे आणि ११ हजारांहून अधिक खलाशी या आखातात अडकून पडले आहेत. मंगळवारीच हा जलमार्ग पुन्हा उघडल्यानंतर युएनने या मोठ्या सुटका मोहिमेची घोषणा केली होती.
















