मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील युरेनियम करारावर शिक्कामोर्तब झाले आहे. मेलबर्नमध्ये पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत संरक्षण, व्यापार, ऊर्जा, अवकाश आणि महत्त्वपूर्ण खनिजे (क्रिटिकल मिनरल्स) यासह अनेक क्षेत्रांतील करारांची घोषणा केली.
मोदी म्हणाले ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियम मिळाल्याने भारताच्या स्वच्छ ऊर्जा मिशनला बळकटी मिळेल. त्यांनी सांगितले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया मिळून क्रिटिकल मिनरल्स कॉरिडॉर देखील विकसित करतील. कोकोस (कीलिंग) बेटावर स्पेस ट्रॅकिंग टर्मिनल तयार केले जाईल, ज्यामुळे भारताच्या गगनयान मिशनला मदत मिळेल. भारत सध्या ४ देशांकडून युरेनियम खरेदी करतो. ऑस्ट्रेलिया पाचवा देश आहे.
युरेनियम अणुऊर्जा आणि बॉम्ब दोन्हीसाठी आवश्यक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे नाते क्रिकेटसारखे आहे. आमच्या भेटी क्रिकेटप्रमाणे होतात. कार्यसूचीमध्ये एकदिवसीय सामन्यासारखे लक्ष केंद्रित केले जाते, निर्णय टी-२० प्रमाणे वेगाने घेतले जातात आणि आमची भागीदारी कसोटी सामन्याप्रमाणे दीर्घकाळ टिकणारी आणि मजबूत आहे. मोदी म्हणाले भारत आणि ऑस्ट्रेलियाचे मत आहे की, दहशतवाद संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर आव्हान आहे. दहशतवादाविरुद्धची आमची लढाई सामायिक आहे आणि या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य सातत्याने मजबूत होत आहे.
पूर्वी आमची धोरणे वेगळी : अँथनी अल्बानीज
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले आतापर्यंत दोन्ही देशांच्या पुरवठा साखळ्या जोडलेल्या होत्या, पण आमची धोरणे वेगवेगळी होती. आजचे हे पाऊल ती दरी मिटवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. ते म्हणाले आज आम्ही २०१५ च्या भारत-ऑस्ट्रेलिया अणुसहकार्य करारांतर्गत भारताला युरेनियम निर्यातीच्या व्यवस्थेवर स्वाक्ष-या केल्या आहेत. आम्ही दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी सातत्याने काम करत आहोत.
सेमीकंडक्टरवर एकत्र काम करणार
दोन्ही देशांनी ऑस्ट्रेलिया-भारत सायबर, क्रिटिकल टेक्नॉलॉजी आणि सप्लाय चेन भागीदारी सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. या अंतर्गत दोन्ही देश आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कंप्यूटिंग, सेमीकंडक्टर, सायबर सुरक्षा आणि डिजिटल रेझिलियन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये एकत्र संशोधन करतील.
















