सुरत : भाजपच्या विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ एकाच पावसात वाहून गेले आहे. सुरतमध्ये दीड दिवसात तब्बल १८ इंच एवढा अवाढव्य पाऊस कोसळला. १९४१ मध्ये एवढाच पाऊस झाला होता. एकाच पावसाने सुरतची ‘बदसुरत’ केली असून संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आहे. एका शॉपिंग मॉलचा एक मजला बुडाला असून रस्त्यावर चारचाकी वाहने तरंगत आहेत. पुरात अडकलेल्या साडेतीन हजार लोकांना बाहेर काढण्यात आले असून शाळा महाविद्यालये, सरकारी कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे.
‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमान कमी असल्याचे भाकित करणा-या हवामान खात्याचे नाकच धो धो कोसळणा-या पावसाने कापले आहे. मुंबईचे चार दिवसांपासून बेहाल केले आहेत. गुजरातमधील ‘क्लॉथ कॅपिटल’ अर्थात वस्त्रप्रावरणांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या सुरतेची पावसाने अक्षरश: बदसुरत केली आहे. अवघ्या ३६ तासांत सुरतेत तब्बल १८ इंच पाऊस झाला. एवढा पाऊस १९४१ च्या जुलैमध्ये नोंदला गेला होता. या महाकाय पावसामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आहे. रस्त्यावर पाच फुटांपेक्षा जास्त पाणी साचल्याने चारचाकी वाहने तरंगत आहेत. शहरातील एका मोठ्या शॉपिंग मॉलचा एक मजलाही बुडाला असून वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
















