35.6 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपची शिंदे सेनेला ‘ऑफर’ नाशिक द्या, ठाणे घ्या..!

भाजपची शिंदे सेनेला ‘ऑफर’ नाशिक द्या, ठाणे घ्या..!

कहाणी में ट्विस्ट । भुजबळ यांच्या माघारीनंतर शिंदे गटात रस्सीखेच; नाशिकची जागा शिंदे गटाच्या हातून जाणार

 

नाशिक : प्रतिनिधी
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीनंतर माघारीची घोषणा केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून नाशिकच्या जागेवर उमेदवार घोषित होणे अपेक्षित होते. परंतु, आता महायुतीत नाशिकच्या जागेवरून नवा ट्विस्ट आला आहे.

या ट्विस्टने शिंदे सेनेची कोंडी केली असून शिंदे सेनेला ठाणे लोकसभा मतदारसंघ हवा असेल तर नाशिक भाजपला सोडण्याची ‘गिव्ह अ‍ॅण्ड टेक’ ऑफर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये आघाडी दिसून येत असल्याने भाजपकडून प्रथम जागेची मागणी करण्यात आली. सन १९८५ वगळता भाजपचा खासदार एकदाही निवडून न आल्याने ही जागा भाजपलाच मिळावी अशी इच्छा व्यक्त झाली.

परंतु शिवसेनेच्या शिंदे गटानेही दहा वर्षांपासून खासदार असल्याने जागेचा आग्रह धरला. शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तयारीला लागण्याची सूचना दिल्यानंतर महायुतीत खटके उडाले.

राज ठाकरे व अमित शहा भेटीच्या पार्श्वभूमीवर मनसेनेही उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतू भाजप व मनसेने एक-एक पाऊल मागे घेतले. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मात्र रस्सीखेच सुरू राहिली. शिंदे गटाकडून ठोस असा दावा केला जात असतानाच अचानक माधव पॅटर्न समोर आला.

भाजपकडून नाशिकची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसला सोडताना छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली. भुजबळ यांचे नाव समोर आल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघाचे वातावरण ढवळले. महायुतीत काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी तगडे समर्थन मिळाले. जनमानसाचा कानोसा नकारात्मक असल्याची बाब समोर आली.

भुजबळ यांच्या माघारीनंतर श्ािंदे गटात जागेसाठी रस्सीखेच सुरु झाली. विद्यमान खासदार गोडसे यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर यांचेदेखील नाव शिंदे गटाकडून चर्चेत आले. त्यात नाशिकची जागा शिंदे गटाच्या हातून जात असल्याचे दिसून येत आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाबरोबरच नाशिकच्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाने दावा केला होता.

ठाणे शिंदे गटाला सुटणार!
नुसता लोकप्रिय किंवा विचारवंत उमेदवार देऊन भागणार नाही. यावर शिंदे गटाचे एकमत झाले आहे. तसा संदेशही भाजपपर्यंत पोहोचल्याचे समजते. त्यामुळे नवीन ‘चेह-या’पेक्षा चर्चेतल्याच नावाचा विचार होऊन तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई ते मिरा-भाईंदरपर्यंत विस्तारलेल्या या मतदारसंघात प्रचाराचे आव्हान उमेदवाराला पूर्ण करावे लागणार आहे. दरम्यान, उमेदवार कोणताही असला तरी आमचा प्रचार सुरू आहे. यावेळी महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आणणे हे ध्येय असल्याने तशी अडचण भासणार नसल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR