33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयपत्नीला भूत, पिशाच्च म्हणणे क्रूरता नाही; हायकोर्टाचा दिलासा

पत्नीला भूत, पिशाच्च म्हणणे क्रूरता नाही; हायकोर्टाचा दिलासा

पाटणा : पतीने आपल्या पत्नीला भूत किंवा पिशाच्च म्हणण्याला क्रूरता म्हटले जाऊ शकत नाही असे महत्त्वाचे निरीक्षण पाटणा हायकोर्टाने नोंदवले आहे. पीठाचे न्यायमूर्ती बिवेक चौधरी म्हणाले की, वैवाहिक संबंधात विशेषत: अपयशी ठरलेल्या वैवाहिक संबंधामध्ये पती आणि पत्नी एकमेकांविरोधात अनेकदा घाणेरड्या भाषेचा वापर करतात. पण, असे सर्वच आरोप क्रूरतेच्या व्याख्येत येत नाहीत.

कलम ४९८अ आणि हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ नुसार पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटणा हायकोर्टाने पतीवरील गुन्हे रद्द केले आहेत. नालंदा अतिरिक्त सत्र न्यायालयाने पतीला दोषी ठरवत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात पतीने पाटणा हायकोर्टात धाव घेतली होती.

महिलेच्या वडिलांनी १९९४ मध्ये मुख्य न्यायदंडाधिका-यांकडे तक्रार दाखल केली होती. मुलीचा पती आणि तिच्या सासरच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. पती मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ करतो असे तक्रारीमध्ये म्हणण्यात आले होते. हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार, पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासानंतर पोलिसांनी पती आणि इतर ११ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर सत्र आणि अपिलिय कोर्टाने आरोपी पतीला एक ते दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर पतीने हायकोर्टात धाव घेतली. पतीच्या बाजूने वकिलाने कोर्टात म्हटले होते की, हुंडा कोणी मागितला, कधी मागितला आणि पत्नीला कशा पद्धतीने त्रास देण्यात आला याचा कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.

महिलेच्या वडिलांनी कोर्टात दावा केला होता की, सासरचे मुलीला भूत आणि पिशाच्च म्हणतात. तसेच मुलीने सासरच्यांकडून अत्याचार होत असल्याचे पत्राद्वारे वारंवार कळवले होते असा दावा वडिलांनी केला होता. हायकोर्टाने यावर म्हटले की, भूत किंवा पिशाच म्हणणे ही क्रूरता नाही. शिवाय, मुलीने वडिलांना लिहिलेले एकही पत्र कोर्टासमोर सादर करण्यात आलेले नाही. हायकोर्टाने फेरविचार याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR