लातूर: NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणात लातूरमधून काल रात्री बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांना अटक झाल्यानंतर आज तपास यंत्रणेने कारवाईचा पाश अधिकच घट्ट केला आहे. आज अंबाजोगाई येथून सीबीआयचे (CBI) एक विशेष पथक थेट लातूर शहरातील डॉ. मनोज शिरूरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून, सध्या तिथे मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीबीआयचे हे पथक डॉ. शिरूरे यांच्या कुटुंबीयांची आणि घरच्यांची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे शोधण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून घरातील संशयास्पद कागदपत्रे, बँक तपशील आणि विशेषतः मोबाईल डेटा हुडकण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर आणि प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी असलेल्या कनेक्शनच्या पार्श्वभूमीवर हा डिजिटल डेटा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
















