वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणविरोधात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा केली. इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धमकी देणा-या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणने सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशांनी घेतलेल्या निर्णयाने इराणमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार आज बुधवारी सकाळी पाच वाजल्यानंतर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा आणि इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होत. परंतु दिलेल्या अल्टिमेटमच्या आधीच इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत आल्याची घोषणा ट्रम्प यांनी केलीये. दोन्ही देशातील युद्ध थांबवण्यात चीन आणि पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचं बोललं जातंय.
शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेकडे एक सविस्तर प्रस्ताव पाठवला होता.या प्रस्तावानुसार दोन्ही देशात वाटाघाटीसाठी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशात १० एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू होईल.
शस्त्रसंधी जाहीर होताच इराणमध्ये जल्लोष
अमेरिकेनं युद्धविरामाची घोषणा केली. या शस्त्रसंधीची घोषणा करताच इराणी नागरिकांकडून मोठा जल्लोष करण्यात आला आहे. इराणची जनता हातात ध्वज घेऊन रस्तावर उतरून जल्लोष करू लागली आहे. जवळपास १ महिन्यापेक्षा अधिक काळ इराणविरोधात अमेरिका आणि इस्राइल यांच्यात युद्ध सुरु होतं. अखेर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करताच इराणमध्ये जल्लोष सुरू झाला आहे.
पाकिस्तानच्या भारताविरोधात ‘डिजिटल कुरापती’
लष्करी मैदानात पाकिस्तानने भारतासमोर नांगी टाकल्या आहेत. त्यानंतरही आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताविरोधात ‘डिजिटल कुरापती सुरू केल्या आहेत. ऑपरेशन सिंदूरदरम्यान नामुष्कीजनक पराभवानंतर पाकिस्तान आता बंदुकीऐवजी खोट्या माहितीचा आधार घेताना दिसत आहे. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुखांनी एक मोठं ‘इन्फॉर्मेशन ऑपरेशन’ आखल्याची माहिती मिळतेय. अन्नासाठी टाहो फोडणा-या पाकिस्तानने ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचं समोर आलं आहे.
इराणकडून १० कलमी प्रस्ताव
वॉशिंग्टनला इराणकडून १० कलमी शांतता प्रस्ताव प्राप्त झाला असून, तो चर्चेसाठी एक व्यवहार्य आधार असल्याचे ट्रम्प यांनी मानले आहे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांत प्राथमिक सहमती झाली असून, या १५ दिवसांच्या काळात कराराला अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे.
१. इराणवर भविष्यात पुन्हा कधीही हल्ला केला जाणार नाही, याची लेखी आणि ठोस हमी द्यावी.
२. युद्धविराम नव्हे, कायमस्वरूपी शेवट: केवळ तात्पुरता युद्धविराम इराणला मान्य नाही; तर युद्धाचा कायमस्वरूपी अंत झाला पाहिजे.
अ३. इस्रायलने लेबनॉनमध्ये सुरू केलेले सर्व हवाई आणि लष्करी हल्ले त्वरित थांबवावेत.
४. अमेरिकेने इराणवर लादलेले सर्व आर्थिक आणि व्यापारी निर्बंध पूर्णपणे उठवावेत.
५. मध्यपूर्वेतील इराणच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध (उदा. हुथी, हिजबुल्ला) सुरू असलेले सर्व लष्करी कारवाया थांबवण्यात याव्यात.
६. वरील मागण्या मान्य झाल्यास इराण जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा खुली करेल.
७. या मार्गावरून जाणा-या प्रत्येक जहाजावर इराण २० लाख डॉलर्स (अंदाजे १७ कोटी रुपये) इतका ‘हॉर्मुझ शुल्क’ आकारेल.
८. या शुल्कातून मिळणा-या उत्पन्नाचा काही हिस्सा शेजारील ओमान देशालाही दिला जाईल.
९. या जलमार्गातून जाणा-या जहाजांच्या सुरक्षिततेसाठी इराण स्वत:ची नियमावली तयार करेल.
१०. जहाजांकडून मिळालेल्या शुल्काचा वापर इराण युद्धात झालेल्या नुकसानीच्या भरपाईऐवजी देशाच्या पुनर्बांधणीसाठी करेल.

