नवी दिल्ली : जगभरात अनेक देशांमध्ये संघर्ष वाढताना पाहायला मिळत आहे. युक्रेन आणि रशियाचे युद्ध गेली अनेक वर्षे सुरू आहे. तर अमेरिका आणि इराण युद्धही तीव्र होताना पाहायला मिळत आहे. यातच भारताच्या सीमारेषेपासून ६० किमी अंतरावर चीनने युद्धाभ्यास केल्याचा दावा करण्यात येत आहे. या सरावात प्रामुख्याने तोफखान्याच्या तुकड्यांनी ताकद दाखवली. चिनी सैन्याने या सरावाचा एक व्हीडीओ समोर आला आहे. या सरावात इतर विविध शस्त्रांचाही वापर करण्यात आला.
चिनी लष्कराचे सरावाचे ठिकाण भारताच्या लडाखजवळ आहे, जिथे २०२० मध्ये भारत-चीन यांच्यात गलवान खो-यात संघर्ष झाला होता. यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये दीर्घकाळ संघर्ष झाला आणि संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीन सैनाच्या चौथ्या मोटाराइज्ड इन्फंट्री डिव्हिजनच्या फायरपॉवर रेजिमेंटने हा सराव आयोजित केला. ही रेजिमेंट शिनजियांगमधील अक्सू प्रांतातील बायचेंग काउंटीमधील शुआंगयोंग रोडवर तैनात आहे. तिबेटमधील या युनिटच्या सरावाचे जीपीएस स्थान भारतीय सीमेपासून फक्त ६० किमी अंतरावर आहे, असे म्हटले जात आहे.
तोफांची चाचणी, रणगाडाविरोधी तंत्रज्ञानाचा सराव
या सरावादरम्यान, चिनी सैन्याने डोंगराळ आणि खडबडीत भूभागासाठी खास तयार केलेल्या चाकांवर चालणा-या स्वयंचलित तोफांचा वापर केला. याव्यतिरिक्त, पीएचएल-११ रॉकेट लाँचर मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीम, एचक्यू-१७ सिरीज टॅक्टिकल एअर डिफेन्स सिस्टीम यांचाही वापर करण्यात आला. यात चिनी सैन्याने रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांनी शत्रूचे रणगाडे आणि चिलखती वाहनांवर हल्ला करण्याचा सरावही केला अशी माहिती आहे.
लष्करी पायाभूत सुविधांची उभारणी
चीन ब-याच काळापासून भारतीय सीमेजवळ लष्करी क्षमता वाढवत आहे. यात चिनी सैन्य आणि हवाई दलाची मोठ्या प्रमाणावर तैनाती समाविष्ट आहे. चीनने गेल्या काही वर्षांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ विस्तृत लष्करी पायाभूत सुविधांची उभारणीही केली आहे. चीनने लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेल्या भागात हवाई तळांचे जाळे उभारले आहे. चीनने पँगोंग सरोवरावर एक पूलही बांधला आहे, ज्यामुळे युद्धाच्या काळात त्यांच्या सैन्याला एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत जाण्यास मदत होईल.
















