मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील सामान्य जनतेला आणि प्रत्येक शिवसैनिकाला एकनाथ शिंदे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असेच मनापासून वाटते. मुख्यमंत्रिपदासाठी सभागृहातील संख्याबळ अत्यंत महत्त्वाचे असते. आज आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ कमी आहे परंतु भविष्यात संख्याबळ वाढवून शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करू असे म्हणत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे.
विजयादशमीच्या (दसरा) पूर्वसंध्येला ठाण्यात माध्यमांशी संवाद साधताना प्रताप सरनाईक यांनी पक्षाची आगामी राजकीय दिशा स्पष्ट केली. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शिवसेनेचा दसरा मेळावा, ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण, अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार, पत्रकारांवरील हल्ले आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना येणा-या धमक्यांवर त्यांनी सविस्तर व रोखठोक भूमिका मांडली.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, काश्मीर असो, केरळचा पूर असो वा कोल्हापूरची आपत्ती; संकटात सापडलेल्या जनतेच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावणारा एकमेव नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या भीषण सावटाखाली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या नावाखाली शक्तीप्रदर्शन किंवा गर्दी करण्यापेक्षा शिवसैनिकांनी थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन स्वखर्चातून मदत करावी, असे थेट आवाहन शिंदे साहेबांनी केले आहे.
शिवसेनेकडून मदतीचा ओघ
एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि शिवसैनिक आपल्या स्वत:च्या खर्चातून राज्यातील दुष्काळग्रस्तांना अन्नधान्य, पाणी आणि आर्थिक साहाय्य पोहोचवत आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा कोणत्याही भपक्याशिवाय अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला जात आहे.
पुर्णेकरांच्या मारेक-यांना भर चौकात फाशी द्या
ठाण्यातील राजकीय कार्यकर्ते प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येवरून विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांचा सरनाईक यांनी समाचार घेतला. प्रदीप पुर्णेकर यांची हत्या अतिशय निर्घृण असून ठाणेकरांनी त्याचा तीव्र निषेध केला आहे. ही घटना घडली तेव्हा एकनाथ शिंदे साहेब शासकीय दौ-यावर होते, ठाण्यात नव्हते. मात्र, विरोधकांनी या दुर्दैवी हत्येचेही घाणेरडे राजकारण करत थेट शिंदे साहेबांना लक्ष्य केले.
टायगर श्रॉफ आणि फिल्म इंडस्ट्रीचे संरक्षण
टायगर श्रॉफच्या घराजवळ गोळीबार झाला तेव्हा उपमुख्यमंत्री मुंबईतच उपस्थित होते. बॉलिवूड ही देशातील एक मोठी रोजगार देणारी इंडस्ट्री असून कलाकारांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे ते तातडीने तिथे पोहोचले. पुर्णेकरांचे मारेकरी असोत किंवा सेलिब्रिटींवर गोळ्या झाडणारे गँगस्टर्स; १९९० च्या दशकाप्रमाणे अशा गुंडांचे एन्काउंटर केले पाहिजे, हीच सामान्य जनतेची भावना आहे.
















