मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर जुहू येथे झालेल्या प्राणघातक गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी सोशल मीडिया आणि प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्य सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराचे सत्र सुरू आहे.
राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांचा पाढा वाचताना नाना पटोले म्हणाले, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ७ गोळ्या झाडल्या जातात. यावरून महाराष्ट्रात कायद्याचा कोणताही धाक शिल्लक राहिलेला नाही, हेच सिद्ध होते.
सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय?
जर उच्चभ्रू जुहू परिसरात, जिथे पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे, तिथे अभिनेत्यांवर गोळ्या झाडल्या जात असतील आणि राजकीय नेत्यांचे खून पडत असतील, तर गल्लीबोळात राहणा-या सामान्य नागरिकाच्या जीविताचे रक्षण कोण करणार? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे.
५६% कमिशनखोरीत मग्न सरकार
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर थेट निशाणा साधताना पटोले म्हणाले, राज्यात सत्ताधारी पक्ष केवळ कमिशन लाटण्यात आणि विरोधकांना नामोहरम करण्यासाठी यंत्रणांचा वापर करण्यात व्यस्त आहेत. गुन्हेगार, खंडणीखोर आणि टोळ्या मोकाट सुटल्या आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांच्या निष्क्रियतेमुळे मुंबईची अवस्था गुन्हेगारांचे कुरण अशी झाली आहे.
















