टेंभुर्णी : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस पाटलावरच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गारअकोले (ता. माढा) येथे घडली असून, या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गु.र.नं. ७४/२०२६ अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मारुती रामचंद्र शिंदे (वय ४६, व्यवसाय झ्र नोकरी, पोलीस पाटील, रा. गारअकोले) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी म्हणून रोहित शिवाजी केचे व शिवाजी गहिनीनाथ केचे (दोघेही रा. गारअकोले, ता. माढा) यांची नावे निष्पन्न झाली आहेत.
फिर्यादीनुसार, दिनांक ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास गारअकोले येथील महेश निकम यांच्या दुकानासमोर फिर्यादी शिंदे हे मतमोजणी अनुषंगाने शासकीय कर्तव्य बजावत बसले असताना, आरोपी दोघे हातात लोखंडी रॉड व लाकडी दांडगे घेऊन तेथे आले. ‘‘तु आमची पोलिसांना माहिती का देतोस, तुला फार माज आला आहे काय,’’ अशी धमकी देत आरोपींनी फिर्यादीवर अचानक हल्ला चढवला. लोखंडी रॉड व दांडक्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अमानुष मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करण्यात आला.
या घटनेनंतर संध्याकाळी ७.४९ वाजता टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता(बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम १०९, ११८(१), ११८(२), ३५१(२), १३२, १२१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांनी केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत. शासकीय कर्तव्य बजावणा-या पोलिस पाटलावरच हल्ला झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

