Homeमहाराष्ट्रवाढत्या उष्णतेमुळे माठांना मागणी वाढली

वाढत्या उष्णतेमुळे माठांना मागणी वाढली

पुणे : प्रतिनिधी
एप्रिल-मे महिन्याच्या वाढत्या उष्णतेमुळे थंडगार पाण्यासाठी मातीचे माठ, सुरई आणि आकर्षक डिझाईनच्या मातीच्या बाटल्यांची मागणी शहरात वाढली आहे. विविध भागांतील मातीच्या वस्तू विक्री केंद्रांवर ग्राहकांची गर्दी वाढत असून, विक्रेत्यांनाही यंदा चांगली कमाई होत आहे.
साध्या माठापासून ते नक्षीकाम केलेल्या रंगीबेरंगी बाटल्यांपर्यंत अनेक पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. साध्या माठांची किंमत सुमारे२५० रुपयांपासून सुरू होत असून, डिझाईन व आकारानुसार ती ८०० ते १,००० रुपयांपर्यंत जाते. किमती वाढल्या असल्या तरी मागणीत कोणतीही घट झाली नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

गच्ची, बाल्कनी किंवा झाडांवर ठेवण्यासाठी लहान मातीची भांडी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहेत. सोसायट्यांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणीही पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली जात आहे. फ्रीजमधील अति थंड पाण्यापेक्षा माठातील पाणी अधिक आरोग्यदायी असल्याने नागरिक त्याला प्राधान्य देत आहेत. नैसर्गिक थंडावा आणि मातीचा सौम्य स्वाद यामुळे माठ पुन्हा घराघरात स्थान मिळवत आहे.
आरोग्यासाठी वरदान माठातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते. मातीच्या सूक्ष्म छिद्रांमुळे पाण्याचे तापमान संतुलित राहते. यामुळे ते पचनासाठी लाभदायक ठरते. तसेच अति थंड पाणी पिण्यामुळे होणा-या घशाच्या व पचनाच्या तक्रारी टाळण्यासाठी माठातील पाणी उपयुक्त मानले जाते. त्यामुळेच आरोग्यदायी आणि नैसर्गिक पर्याय म्हणून माठांचा वापर पुन्हा वाढताना दिसत आहे.

उकाड्यात ताडगोळ्यांचा गारवा
नवी मुंबई शहरातही वाढत्या तापमानाचा तडाखा बसू लागला आहे. त्यामुळे आता रस्त्याकडेला झाडांच्या सावलीत रसाळ आणि गोड असे ताडगोळे विकणा-यांकडे नागरिकांची पावले वळू लागली आहेत. यामुळे ताडगोळ्यांच्या विक्रीतून ग्रामीण विक्रेत्यांना हंगामी रोजगाराची संधीही निर्माण झाली आहे.सध्या सकाळपासूनच सूर्यनारायण कोपत असल्याने नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
यामुळे शरीराची होणारी काहिली कमी करण्यासाठी अनेकजण ऊसाचा रस, शहाळी व कैरीच्या पन्हाचा आधार घेत आहेत. मात्र, त्यातही सध्या पांढ-या शुभ्र, मऊ व चवीला गोड ताडगोळ्यांनी पर्यटक आणि स्थानिकांना भुरळ घातली आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण समतोल राखण्यासाठी ताडगोळे हा नैसर्गिक पर्याय मानला जातो. पारदर्शक खोब-यासारखे दिसणारे ताडगोळे गोड, तुरट चवीचे असतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR