नांदेड : प्रतिनिधी
अगोदरच तोट्यात चालणा-या एसटीचे चाक डिझेल दर वाढीने आणखी खोलात गेले आहे. या दरवाढीचा मोठा फटका बसत महामंडळाला बसत असून सध्या दरमहा अतिरिक्त ५० लाखांचा खर्च वाढला आहे. परिणामी येत्या काळात एसटीची भाडेवाढ होण्याची शक्यता गडद झाली आहे.
इंधन दरवाढीचा फटका एसटी महामंडळाच्या रूपाने बसणार आहे. महामंडळाच्या नांदेड विभागातंर्गत शहरातील आगारासह जिल्ह्यात एकुण ९ आगार आहेत. येथुन दररोज हजारो प्रवाशी प्रवास करत असतात. या ९ आगारात दरवाढी पुर्वी एप्रिल महिन्यापर्यंत दर महिन्याला ८ कोटी ९४ लाख ८५ हजार रुपयांचा डिझेलचा खर्च होता. मात्र डिझेलची दरवाढ झाल्याने मे महिन्यात हा खर्च ९ कोटी ४४ लाख ७० हजार रुपये एवढा झाला आहे.
आजच्या डिझेलच्या प्रति लिटर दरानुसार महामंडळाचा तब्बल ५० लाख रुपयांचा खर्च वाढला. यामुळे एसटीचे आणखी खोलात गेले आहेत. अगोदरच तोट्यात असेलल्या एसटी महामंडळावर इंधन दरवाढीमुळे अतिरिक्त खर्चाचा भार वाढत असल्याने आगामी काळात एसटीच्या तिकिटाचे दर वाढवण्याची शक्यता गडद झाली आहे.
















