नांदेड : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवार दि. ४ पहाटे १.३० वाजता पिंपळगाव निमजी येथील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई केली. या कारवाईत दोन बोटी, २० तराफे जाळून नष्ट करण्यात आले असून सुमारे १२५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजित किंमत ३० लाख रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.
अचानक केलेल्या पाहणीत गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तत्काळ तहसीलदार संजय वारकड यांना माहिती दिली. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून कारवाई सुरू केली. यावेळी नांदेड ग्रामीण आणि लिंबगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने दोन बोटी व २० तराफे नष्ट करून मोठ्या प्रमाणात वाळू जप्त केली.
दरम्यान, कारवाईनंतर परतत असताना शहर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारी २ वाहनेही पकडण्यात आली. ही वाहने पुढील कारवाईसाठी वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली. तसेच घटनास्थळी आढळलेल्या ४ मजुरांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
















