नांदेड : प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांची पुणे शहराच्या उपायुक्त (डिसीपी) पदी बदली झाली असून हिंगोलीचे निलभ रोहन यांची नांदेड जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने २३ जून रोजी काढले आहेत.
नांदेडचे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून अबिनाश कुमार यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी विविध मिशनद्वारे भक्कम कारवाई केली. त्यांच्या काळात सराईत गुन्हेगारांना हद्दपार, स्थानबद्ध करण्यात आले आहे. गंभीर गुन्हे, दोन टोळयांच्या गँगवॉरमधील गुन्हेगार काही कालावधीतच जेरबंद करण्यात केले. त्यांनी रोजगार मेळावा घेऊन अनेक बेरोजगाराना रोजगाराची संधी दिली होती.
शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सायबर शाखेतर्फे विशेष प्रबोधन करण्याचे काम त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतून साकार झाले होते. महिलेविषयक कोणतीही तक्रार कोणत्याही पोलिस ठाण्यात आल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी देऊन महिलांवरील अत्याचारावर प्रतिबंध घातला होता. हजारोंच्या संख्येने मिसिंग मोबाईलच्या तक्रारीचे निवारण करून त्यांच्या मूळ मालकांना मोबाईलचे वाटप केले होते. कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी करून गुन्हेगारीवर अंकुश बसविला होता.
















