नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी रविवारी नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान सुरू केले. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या संबोधनात ते म्हणाले की, भारतात अंमली पदार्थांचा पुरवठा हा शत्रू राष्ट्रांच्या दहशतवादी कटाचा भाग आहे.
पंतप्रधान म्हणाले शत्रू राष्ट्रांना भारतीय तरुणांना अंमली पदार्थांच्या जाळ्यात ढकलण्याची इच्छा आहे. त्यामुळे हा कट एकत्रितपणे हाणून पाडावा लागेल. विकसित भारताचे उद्दिष्ट तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा देशातील तरुण शारीरिक आणि मानसिकदृष्टया तंदुरुस्त असण्यासोबतच व्यसनांपासून दूर राहील. त्यांनी सांगितले की, पुढील १०० आठवडे दर रविवारी कला, संस्कृती, खेळ आणि इतर उपक्रमांद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश देशभरात पोहोचवला जाईल. पंतप्रधानांनी तरुणांना या अभियानाचे नेतृत्व करण्याचे आणि २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यात आपली भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की व्यसन तरुणांचे लक्ष विचलित करून त्यांना हळूहळू त्यांच्या स्वप्नांपासून दूर नेते. आज भारताचे तरुण स्टार्टअप, अक आणि स्पेस यांसारख्या क्षेत्रांमध्ये जगाचे नेतृत्व करत आहेत, परंतु जर एखादा तरुण अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडला, तर केवळ त्याचे स्वप्नच नाही, तर संपूर्ण कुटुंब हरते. व्यसन एका वडिलांची स्वप्ने आणि बहिणीच्या आशाही उद्ध्वस्त करते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात अंमली पदार्थांचे व्यापारी आणि तस्करांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई केली जात आहे.
मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले जात आहेत आणि कारवाई पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वाढली आहे. ते म्हणाले की, हे सरकारच्या अंमली पदार्थांविरुद्धच्या शून्य सहिष्णुता धोरणाचे प्रमाण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारतासाठी नशा मुक्त युवा संकल्प अभियान’ सकाळी ११ वाजता सुरू झाले. पंतप्रधानांच्या संबोधनापूर्वी देशभरातील तरुणांनी एकाच वेळी नशा मुक्त भारतची शपथ घेतली. हा कार्यक्रम व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील २८ हजारहून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आला. या अभियानात १ कोटींहून अधिक तरुण सहभागी झाले. या कार्यक्रमात ५ प्रमुख आध्यात्मिक गुरु—अम्मा, श्री श्री रविशंकर, दाजी, डॉ. चिन्मय पंड्या आणि स्वामी ब्रह्मविहारीजी देखील व्हर्चुअली सहभागी झाले. याव्यतिरिक्त अनेक मुख्यमंत्री आणि राज्यपालही या कार्यक्रमात उपस्थित होते.
तरुणांना लक्ष्य
पंतप्रधानांनी सांगितले की, व्यसन केवळ व्यक्तीलाच नाही, तर राष्ट्राच्या ताकदीलाही कमकुवत करते. शत्रू देश भारतीय तरुणांना अंमली पदार्थांच्या जाळ्यात ओढण्याचा कट रचतात. सरकार अंमली पदार्थांच्या व्यावसायिकांवर आणि तस्करांवर सातत्याने कठोर कारवाई करत आहे.
अंमली पदार्थ थोड्या वेळाचा आनंद
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अंमली पदार्थ काही काळासाठी आनंद देतात, पण करिअर आणि कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करतात. ते म्हणाले की, आपल्या संत आणि गुरुंनीही व्यसनांपासून दूर राहण्याचा उपदेश दिला आहे. श्री गुरु ग्रंथ साहिबचा उल्लेख करत ते म्हणाले की, जे व्यसन माणसाची बुद्धी आणि विवेक हिरावून घेते, ते त्याला अधोगतीकडे नेते.
तरुणांना दुसरी संधी मिळाली पाहिजे
पंतप्रधान म्हणाले की, जे तरुण व्यसनाधीनतेशी लढून बाहेर पडतात, ते दुर्बळ नसून खरे योद्धे आहेत. समाजाने त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांना स्वीकारले पाहिजे आणि दुसरी संधी दिली पाहिजे. एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ त्याची ओळख नसतो, तर अडचणीतून बाहेर पडण्याचे त्याचे धैर्य हीच त्याची खरी ओळख असते.
















