धाराशिव : प्रतिनिधी
साडेसोळा लाख रूपयांची सुपारीची पोती चोरणा-या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासाच्या आत गजाआड केले. ही घटना कळंब शहरात २ डिसेंबर रोजी घडली होती.
कळंब येथील महादेव मनोहरराव घुले यांच्या गोडावूमधून १६ लाख ६० हजार १२५ रूपयांची सुपारीची ४५ पोती चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात २ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला. पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस हावलदार औताडे, जानराव, फरहान पठाण, पोलीस नाईक जाधवर, पोलीस हावलदार समाधान वाघमारे, हुसेन सय्यद, चालक पोलीस अमंलदार भोसले यांचा समावेश होता. हे पथक उपविभाग कळंब हद्दीतील मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणेकामी पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी पथकास गोपनीय माहिती मिळाली कि, पारधी पिढी, कळंब येथील शंकर मच्छिंद्र काळे, श्रीकांत उर्फ बबलु बापु पवार व इतर आरोपींनी सुपारीची चोरी केली. ते सध्या कल्पनानगर पारधीपिढी येथे लपून बसले आहेत. पथकाने तेथे जाऊन आरोपी शंकर मच्छिंद्र काळे, श्रीकांत उर्फ बबलु बापु पवार दोघे रा. कल्पानगर, पारधी पिढी, कळंब यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी यांचे ताब्यातून गुन्ह्यात चोरी गेलेल्या मालापैकी सुपारीचे २३ पोते, निळ्या रंगाचे सोनालिका ट्रॅक्टर हेड असा एकुण ९ लाख ९५ हजार १७५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी कळंब पोलीस ठाणे येथे हजर केला आहे.