पुणे : इराण अमेरिकेमधील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यानंतरल हिंदुस्थानातही इंधनाचे दर वाढवण्यात आले होते. मात्र आता अमेरिका व इराणमध्ये युद्धबंदी करार झाला असून परिस्थिती पूर्ववत होत आली आहे. त्यामुळे जगभरात कच्च्या तेलाचे दर कोसळून ७० ते ७३ डॉलर प्रति बॅरेलवर आले आहेत. मात्र कच्च्या तेलाच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेले नाहीत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधा-यांवर निशाणा साधला आहे.
अमेरिका-इराण युद्धाच्या काळात क्रूड ऑइलची किंमत तब्बल ९० ते ११५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेल्याचे कारण देत केंद्र सरकारकडून देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आले होते. आता युद्ध संपुष्टात आल्यानंतर हीच किंमत ७३ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आली आहे तरी देखील शासनाने युद्ध काळात वाढवलेल्या देशभरातील इंधनाच्या किंमती कमी होत नसतील तर हा सामान्य नागरिकांवर टाकलेला सरकारी दरोडा नाही का?, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
इंधनाचे दर २० टक्के तरी कमी करा
पुढे ते म्हणाले की सामान्य जनता आधीच महागाईने होरपळून निघत असताना सरकार जनतेला लुटण्याऐवजी इंधनाचे दर ३० टक्के कोसळल्याने आता किरकोळ बाजारातील दर किमान २० टक्के तरी कमी करण्याचे औदार्य दाखवेल का, हा खरा प्रश्न आहे.
















