नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची शासन दखल घेऊन शेतक-यांना मदत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकरी बांधवांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची शासनाच्यावतीने ग्वाही देतो, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाच्या स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस पथकाने धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. पालकमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी खा. अशोक चव्हाण, खा. प्रा. रविंद्र चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. भीमराव केराम, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, नागरिक व पत्रकार आदी उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ४८७ शेतक-यांची माहिती संकेतस्थळावर नोंदविण्यात आली असून, त्यापैकी ६४ हजार २७९ शेतक-यांच्या खात्यांवर आतापर्यंत ४८८ कोटी १९ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी कृषी क्षेत्रातील अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतक-यांना कर्जफेडीचे ना-देय प्रमाणपत्र देण्यात येत असून, बँकांनी त्यांना तातडीने नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ९७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतक-यांना मदत करण्यासाठी शासन योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ९६६ कोटी रुपयांचे, तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्यापोटी ७६ कोटी ५३ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे शेतक-यांना आर्थिक दिलासा मिळाला असल्याचे पालकमंत्री सावे यांनी सांगितले.
















