परभणी : परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथरी तालुक्यात धाडसी कारवाई करत ८ लाख ७४ हजार ३५० रुपयांचा अवैध गुटखा व स्विफ्ट डिझायर कार जप्त केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने कार सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. २५ जुलै रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास पाथरी तालुक्यात पेट्रोलिंग करत असताना आष्टीकडून पाथरीकडे स्विफ्ट डिझायर कारमधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने पाथरी-आष्टी रोडवरील वडी पाटी येथे सापळा रचला. दरम्यान, पोलिसांचे वाहन पाहताच संशयित चालकाने कारसह पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत रामपुरी-ढालेगाव मार्गावरील रामपुरी गावाजवळ आरोपीने अंधाराचा फायदा घेत कार सोडून फरार झाला.
यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये राज निवास सुगंधित पान मसाला आढळून आला. या कारवाईत २ लाख ७४ हजार ३५० रुपयांचा गुटखा आणि ६ लाख रुपयांची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ८ लाख ७४ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. जायभाय, पीएसआय सवंडकर, पोलिस अंमलदार विलास सातपुते, सचिन भदर्गे, सूर्यकांत फड, महेश पांगरकर, माणिक वाघ, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, पुरी, हनवते आणि सय्यद यांनी संयुक्तपणे केली. पुढील तपास पाथरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
















