नांदेड : प्रतिनिधी
किनवट तालुक्यातील कोसमेट शिवारात असलेल्या आर्या बार समोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ मे रोजी छापा टाकला. त्यात पिकअप वाहनासह प्रतिबंधित केलेला २७ लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी ३ आरोपींवर इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दारासिंग राठोड, हवालदार मोहन हाक्के, मिलिंद नरबाग, लहू चाटे, आबाराव पिंगलवाड यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथक २४ मे रोजी इस्लापूर पोलीस ठाणे हद्दीत कोसमेट शिवारातील आर्या बारजवळ पिकअप वाहनाला पकडले. यात राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटका, सुगंधित पान मसाला, सुगंधित जर्दा, तंबाखू असा एकूण १७ लाख १ हजार २५० रुपयांचा साठा आढळला. पिकअप वाहनासह गुटखा साठा असा एकूण २७ लाख १ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
















